इस्लामाबाद – पाकिस्तानसमोरील आर्थिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, पाकिस्तान सरकार विदेश कर्जाचे देय आणि विदेशी गंगाजळी मजबूत करण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये आणखी 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याची योजना आखत आहे. एका वर्षातील हे दुसरे मोठे कर्ज प्रकरण असेल.
पाकिस्तानी अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने पाकिस्तानातील वृत्तपत्राने अशी माहिती दिली आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सरकार 15 अब्ज डॉलरचे कर्ज घेणार आहे. यापैकी 10 अब्ज डॉलर आधी घेतलेल्या कर्जाच्या मॅच्यूरिटीवर देय देण्यासाठी करण्यात येणार आहे.
अहवालात सांगितले आहे की, ही रक्कम देय व्याजापेक्षा अधिक आहे. उर्वरित रक्कम देशाच्या सार्वजनिक कर्जाचा हिस्सा बनेल. यावर्षी मार्चच्या शेवटापर्यंत ही सार्वजनिक कर्जाची रक्कम वाढून 86.4 अब्ज डॉलर झाली आहे.
करोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी याआधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 1.39 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. पाकिस्तानला ही रक्कम देखील मिळाली आहे. पाकिस्तानने जुलै 2018 ते जून 2021 या कालावधीमध्ये 40 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे.
यावरून पाकिस्तानच्या वाढणाऱ्या कर्जाचा अंदाज लावता येईल. यातील 27 अब्ज डॉलरचा वापर जुने कर्ज फेडण्यासाठी करण्यात येणार आहे तर 13 अब्ज डॉलरला सार्वजनिक कर्जामध्ये जोडण्यात येणार आहे.