शिरवळ – खंडाळा तालुक्यात करोना महामारीने थैमान घातले असून पोलीस दलातील अधिकारी व शिरवळ येथील एका कंपनीच्या अपार्टमेंटमधील 72 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर वाई ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेविकेचे खंडाळा तालुक्यातील अहिरे गावाशी कनेक्शन आढळल्यामुळे आरोग्य प्रशासन पुन्हा दक्ष झाले असून तालुका हादरला आहे.
तालुक्यातील 53 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून करोनाला रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. अंदोरी (ता. खंडाळा) येथील पहिल्या करोनाबाधित रुग्णाचा सातारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 29 वर जाउन पोहचली आहे.
खंडाळा तालुक्यातील बाधित गावातील रुग्णांची साखळी खंडीत करण्यात प्रशासनाला नुकतेच यश आले असतानाच सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर चेकनाका उभारण्यात आला आहे. याठिकाणी अहोरात्र पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चेकनाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यामधील व सध्या चेकनाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या तीस वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाची तपासणी केल्यावर सोमवारी दि. 1 जून रोजी रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या उपनिरीक्षकाच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरु होते. पोलीस उपनिरीक्षक राहत असलेल्या सोसायटीमधील परिसर सील करण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी बाधित झाल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, तहसीलदार दशरथ काळे, वैद्यकीय अधिकारी अविनाश पाटील यांनी येथे भेट देऊन सूचना केल्या. खंडाळा तालुक्यातील आठ गावांमध्ये करोनाचे 25 रूग्ण आढळून आले होते. हे सर्वच रुग्ण बाहेरून प्रवास करून आले होते. रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करुन ही साखळी खंडीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. या सर्वच गावांतील संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने निश्वास सोडला होता. मात्र शिरवळ येथील एका कंपनीच्या कामगारांसाठी असलेल्या अपार्टमेंटमधील 72 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सहा दिवसांपूर्वी हे कुटुंब परजिल्हयातून आले होते. अपार्टमेंटमधील इतर संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. तसेच वाई येथील ग्रामीण रुग्णालयातील एका 24 वर्षीय आरोग्य सेविकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या अहिरे गावच्या रहिवाशी असल्याने या गावातही दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे शिरवळ पोलीस चौकीचे चार अधिकारी व 12 कर्मचारी तसेच महिलेच्या निकटवर्तीय चार नागरिक तसेच अहिरे 23 नागरिक “हाय रिस्क’मध्ये आहेत. रुग्ण आढळले आहेत तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून या ठिकाणचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.