मुंबई – मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित’. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. चित्रपट, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्वीनी नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
दरम्यान, ‘१०० डेज’ असं या मालिकेदरम्यान घडलेला किस्सा सांगत तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ‘१०० डेज’ या मालिकेत तेजस्विनीने आदिनाथ कोठारेसोबत काम केलं होतं. विशेष म्हणजे ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. या मालिकेचं शीर्षकगीत शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, ‘या शोने मला खूप वेगळा अनुभव दिला. आयुष्यभराची एक खूण पण. (हे टायटल साँग शूट करताना माझ्या पाठीत आरसा पडला.) पण तुम्हाला माहितंच असेल की मी साहसी व लढाऊ प्रवृत्तीची आहे आणि त्या खूणने मला आणखीन सुंदर बनवलं. संपूर्ण मालिकेत मी डीप नेक (deep neck) ब्लाऊज घालून ती खूण मिरवली. असो, मला या शोने एका वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवलं. मी Antogonist म्हणजेच खलनायिका असून सुद्धा राणी सरदेसाई शेवटच्या क्षणापर्यंत पकडली जाऊ नये असं प्रेक्षकांना वाटणं हेच त्या पात्राचं यश होतं. आणि यात seductress चा रोल निभावताना माझे मध्यम वयोगटातील पुरूष चाहते होतेच, पण पोलीस कर्मचारी, लहान मुलं, बायका आणि वयोवृद्ध तरुणही चाहते झाले हे आज सांगताना मज्जा वाटते.’