श्रीगोंदा -ऐतिहासिक काळापासून कला आणि कलाकार मंडळींना अनेक मोठमोठ्या हस्तींच्या दरबारात मानाचं स्थान मिळालं. लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेकांना घरबसल्या आपले छंद जोपासण्याची संधी मिळाली आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या सुनबाई असलेल्या सुवर्णा गाडेकर – गोरे यांनी आपल्या हस्तकौशल्यातुन सोशल मीडियाचा ताबा घेतला आहे.
राहाता येथे माहेरघर असलेल्या सुवर्णा श्रीगोंद्याच्या स्नुषा आहेत. माध्यमिक शिक्षक म्हणून सध्या कोपरगाव येथे कार्यरत असलेले सुरेश गोरे यांच्या त्या अर्धांगिनी. सुवर्णा या देखील कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहतात. सध्या लॉकडाऊनमुळे फावल्या वेळात त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे.
समाजाप्रती विशेष योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींचे चित्र त्यांनी आपल्या पेन्सिलीतुन रेखाटले आहे.
शाहरुख खान पासून ते सुबोध भावे आणि खा. सुप्रिया सुळें पासून ते खा. डॉ.सुजय विखे यांसह अनेक सेलेब्रिटी काही विख्यात लोकप्रतिनिधी आदींची उबेहुब चित्रे त्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत रेखाटली आहेत.
पेन्सिलच्या ताकदीने डोळ्यातील अश्रू दूर
सुवर्णा गाडेकर-गोरे यांची मुलगी डॉक्टर आहे. करोनाच्या रुग्णालयात ती सेवा बजावत आहे. मुलीच्या काळजी ने रोज रडू येत होते. मात्र देशावर आलेल्या संकटात लढणाऱ्या प्रत्येकाला आपण प्रोत्साहित केले पाहिजे. ही भावना मनात आली. पेन्सील हातात घेतली अन् पहिले चित्र माझ्या मुलीचं मी काढले. ते अनेकांना आवडले. अन तेथून करोना योद्धा म्हणून लढणाऱ्या अनेकांची चित्र रेखाटण्याची ऊर्जा मिळाली. लोकडाऊनच्या काळात आजपर्यंत सुमारे 35 चित्र पूर्ण झाले आहेत, अशी माहिती सुवर्णा गाडेकर यांनी दै. प्रभात शी बोलताना दिली.