अकोले -अकोले तालुक्यात 17 मे नंतर तब्बल दोन हजार 897 व्यक्ती गावी परतल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेची अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान तालुक्यातील लिंगदेव एक, पिंपळगाव खांड तीन, समशेरपूर एक, ढोक्री एक, पिंपळगाव खांड एक, डोंगरवा येथील एक, असे आठ जण करोनाबाधित सापडले आहेत. तर डोंगरगाव, मेहेंदुरी, निंब्रळ येथील संशयित रुग्ण नगर पाठवले गेल्याने लोकांची भीती वाढली आहे.राजूर, कोतूळ, पाडाळणे, सावरगाव पाट, डोंगरगाव, हिवरगाव येथे लॉकडाऊन सुरू आहे. तर अकोले व्यापारी असोसिएशनने स्वेच्छेने लॉकडाऊन सुरू केले आहे.
नुकताच नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांना 29, 30 व 31 मे या कालावधीत अकोले लॉकडाऊनचा प्रस्ताव दिला. डॉ पटेल यांनी तो तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे पाठविला. पण कांबळे यांनी तो फेटाळून लावला. मात्र व्यापारी असोसिएशनने आपल्या धोरणानुसार अकोले लॉकडाऊन सुरू ठेवला. अत्यावश्यक सेवा यातून वगळल्याने जनजीवन सामान्य राहिले.
दरम्यान शहरी भागात राहणारे अकोले तालुक्यातील भूमिपुत्र परतल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर खबरदारी म्हणून माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी या संदर्भात पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या प्रसंगी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे उपस्थित होते.
यामध्ये 17 मे नंतर अकोले तालुक्यात मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणांवरून दोन हजार 897 इतके नागरिक आले आहेत. यामध्ये दोन हजार 167 इतके नागरिक गावपातळीवर, शाळा, महाविद्यालय व इतर प्रशासकीय इमारतींमध्ये 14 दिवसांकरिता क्वारंटाईन केले गेले आहेत. तर 230 जणांना स्वतःच्या घरी क्वारंटाइन केले असून, त्यांच्यावर देखरेख करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. उद्यापासून नियमित या नागरिकांची तपासणी होणार असून, यापैकी एखाद्याला करोनाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे.
मेंगाळ म्हणाले की, 17 मे नंतर तालुक्यात ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जी गावे येतात या गावांमध्ये 528, खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये 251, कोहने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 355, कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 336, लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 251, मवेशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 167, म्हाळदेवी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 372, देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 153, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 336, विठा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 184 नागरिक क्वारंटाईन आहेत.