शहरातील गेल्या 24 तासांतील स्थिती
पुणे – करोनातून बरे झालेल्या 194 जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 108 बाधित व्यक्ती सापडले आहेत, अशी माहिती महानगपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मागील दोन दिवसांत जवळपास दीड हजार जणांचे तपासलेल्या नमुन्यांतून नवीन 108 बाधित व्यक्ती सापडले आहेत. तर दिवसभरात आणखी 1200 जणांचे नमुने घेण्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पहिल्यांदाच बाधितांपेक्षा घरी सोडलेल्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 3 हजार 644 जणांना घरी सोडण्यात आले.
सद्यस्थितीत 2 हजार 248 बाधित व्यक्ती विविध रुग्णालयांत उपचार घेत असून, त्यातील 170 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 43 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला असून, 127 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 5 हजार 568 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 8 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामध्ये दौंड तालुक्यातील 89 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर अन्य सात जण हे वय वर्षे 47 ते 80 वयोगटातील आहेत. ताडीवाला रोड परिसरात राहणाऱ्या अत्यवस्थाचा ससूनमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.