सातारा – जिल्ह्यातील साकुर्डी येथील युवकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 485 झाली आहे. जिल्ह्यातील 15 रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले. तर विंग येथील करोनाबाधितासह तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील 194 जणांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर 259 संशयितांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट करोनाबाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडील 132 जणांचे अहवाल व जिल्ह्यातील 62 जण अशा एकूण 194 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे कृष्णा मेडीकल कॉलेजने कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 46, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 38, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 5, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 77, खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील 60, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 9 व रायगाव येथील 24 अशा एकूण 259 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील करोना संशयित म्हणून वाई तालुक्यातील आंबेदरे आसरे येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर नमुना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एका करोनाबाधितासह तिघांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या इतर दोघांच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये विंग येथील करोनाबाधित तसेच किडनीचा आजार असलेल्या 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा रात्री दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कराड तालुक्यातील पाठरवाडी येथील 33 वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील 65 वर्षीय महिला अशा दोघांचा शुक्रवारी दि. 29 मे रोजी मृत्यू झाला आहे.
करोना संशयित म्हणून या दोघांच्या घशातील स्त्रावांचा नमुने पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. विंग येथील मृत्यू झालेल्या रुग्णावर कराड येथील कोव्हिड19 स्मशानभूमीत नगरपालिकेकडून अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. अंत्यविधीवेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, पालिका आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.