मिनियापोलीस – अमेरिकेत पोलिसाकडून झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ संचारबंदी धुडकावून हजारोजणांनी पोलिसांच्या विरोधात निदर्शने करायला सुरुवात केली आहे. आज सलग चौथ्या दिवशी ही उग्र निदर्शने सुरू आहेत. आंदोलनाचे हे लोण आता अनेक शहरांमध्ये पसरायला लागले आहे.
पेंटॅगॉनने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून लष्कराला सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता भासल्यास बंदोबस्तासाठी तैनात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. डेट्रॉईट शहरात एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर अटलांटा आणि न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांची मोडतोड करण्यात आली होती.
जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मानेवर एक पोलीस अधिकारी गुडघ्याने दाब देऊन उभा राहिला होता. त्यामुळे प्रक्षुब्ध जमवाने हिंसाचार केला होता. त्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्या आणि विद्वेषातून हिंसाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या हिंसाचारादरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाला, मात्र कोणीही जखमी झाले नाही, असे मिनियापोलीस पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र हिंसाचारादरम्यान एक रेस्टॉरंट, बॅंक आणि ऑफिस डेपोला आग लावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारीही जमावाने एका पोलीस स्टेशनला आग लावली. मिनियापोलीसचे गव्हर्नर टिम वाल्झ यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे हिंसाचार आटोक्यात आणण्यास असमर्थता दर्शवली.
फ्लॉईडचा मृत्यू आणि आफ्रिकन अमेरिकनांवरील पोलिसांच्या बऱ्याच वर्षांच्या हिंसाचारामुळे देशव्यापी निषेध व्यक्त केला जात आहे. न्यूयॉर्क, ह्युस्टन, वॉशिंग्टन आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. निदर्शक आणि पोलिसांमध्ये ठिकठिकाणी चकमकी घडत आहेत.