कराड -अंबवडे-पांढरेचीवाडी ता. कराड येथील वांग नदीच्या पात्रता गुरूवार दि. 27 रोजी मध्यरात्री अवैध वाळू उपशावर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात सुमारे 50 ब्रास वाळूसह एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर-ट्रेलरसह बीएमडब्ल्यू व इंडिका कार असा सुमारे 42 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी मंडलाधिकारी दत्तात्रय चंद्रकांत दीक्षित (वय 48) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटना स्थळावर आढळून आलेल्या खाजी मौलासाब वल्ली (वय 20 रा. मुंढे ता. कराड) व इतर दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस व तहसील कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, आंबवडे-पांढरेचीवाडी, ता. कराड येथील वांग नदीच्या पात्रात जेसीबी, ट्रॅक्टर व अन्य वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मिळाली. वाकडे यांच्या पथकाने बुधवार दि. 27 रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाळू भरण्यासाठी जाणाऱ्या वाहनांचा माग काढला असता पांढरेचीवाडी शिवारात खासगी चारचाकी इंडिका क्र. एमएच 11 ए. डब्ल्यू 2115 व बीएमडब्ल्यू एम. एच. 50 एच. 9000 ही वाहने शेतात अन्य कोणी व्यक्ती आत येऊ नये, अशा पध्दतीने जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारी वाहने तेथेच लावून चालत पुढे जात असताना एका ट्रक्टरमध्ये चालक आढळून आला. त्याने त्याचे नाव खाजी मौलासाब वल्ली रा. मुंढे ता. कराड असे सांगितले.
त्यानंतर रस्त्याच्याकडेला पिवळ्या रंगाचा जेसीबी त्याच्या काचेवर आरोही अर्थमुर्व्हर्स साळशिरंबे प्रो. प्रा. पंकज पाटील व मोबाईल क्रमांक आहे. तर एक ट्रॅक्टर तेथे वाळू डेपो करत असल्याचे आढळून आले. तर पुढे एम. एच. 11 एच. 1688 ट्रॅली क्र. एम. एच. 11 आर. 6184 व न्यू हॉलंड 5500 कलर निळा पासिंग नसलेला असे तीन ट्रॅक्टर वाळू वाहतूक केल्याचे मिळून आले आहेत.
सदर ठिकाणी 15 लाख रूपयांचा जेसीबी, 6 लाख रूपये किंमतीचे तीन ट्रॅक्टर, इंडिका कार 80 हजार रूपये, बीएमडल्ब्यु कार 19 लाख रूपये तसेच 50 ब्रास वाळू 2 लाख असे एकूण 42 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हवालदार दिनकर काळे करत आहेत. दरम्यान, कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज ऊत्खननाला या कारवाईमुळे चांगलीच चपराक बसली आहे.
तहसीलदार कराड ते दहा-बाराजण कोण ?
आंबवडे-पांढरेवाडी, ता. कराड येथील गट नं. 219 च्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सदरचा वाळूसाठा करण्यात आला आहे. याचे 10 ते 12 जण मालक असल्याचे ट्रॅक्टर चालक खाजी वल्ली याने सांगितले आहे. दरम्यान, त्याठिकाणी असलेले वाहनचालक व अन्य लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.वैध वाळू उपसा करणारे ते दहा-बाराजण कोण आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
कराड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन तसेच वाहतूक प्रकारणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अवैध उत्खननावर कारवाई केली जाणार आहे. गुरूवारी मध्यरात्री आंबवडे-पांढरेवाडी येथे अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अमरदीप वाकडे