पुणे(प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी तबल 122 किलो वजनाचा गांजा बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या कोठडीत 1 जुनपर्यंत वाढ करण्याचा आदेश सत्र न्यायाधीश एच.आर. वाघमारे यांनी दिला आहे.
समीर हसनअली शेख (वय 37), अश्विन शिवाजी दानवे (वय 26), हिनायतउल्ला मोहमदअली शेख (वय 41), शहाबाज शब्बीर खान (वय 28), तैफिक हुसेन शेख (वय 31, सर्वजण रा. मुंबई) अशी कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नीलेश महाडिक यांनी फिर्याद दिली आहे. खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत. 24 मे रोजी सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष बागायत संघाच्या कमानीसमोर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत गांजासह मोबाइल, स्कोडा गाडी, टेम्पो, बेलेरा पिकअप आणि रोख रक्कम मिळून तब्बल 38 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पाच जणांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, ते गांजा आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणम येथून आणला असल्याचे सांगत असून, ते गांजा नक्की कोणाला देणार होते. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीशी संबंध आहे, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहे का?, अश्या प्रकारे आणखी कोठे गांजाची साठवणूक केली आहे का?, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोणी आहे?, याचा तपास करण्यासाठी सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. मोरे यांनी केली.