नाशिक: राज्यातील करोनाबाधितांचा दिवसेंदिवस वाढत असताना आता अनेक राजकीय नेते, मंत्रीही करोनाच्या कचाट्यात येत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अन्य एक मंत्री करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी करोनावर मात केली आहे, तर अन्य एका मंत्र्यावर उपचार सुरु आहेत. यानंतर आता नाशिकच्या एका आमदाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला करोनाची बाधा झाली आहे.
आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. आमदाराच्या कुटुंबातील काहीजण मुंबईला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. बहीण आणि मुलगी यांचा करोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आमदारांचा अहवालही गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. आमदारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गुरूपर्यंत 1074 वर पोहोचली. मालेगावात सर्वाधिक रुग्ण आहेत. नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या 152 वर पोहोचली आहे.