मांडवगण फराटा -येथे दिल्ली येथून आलेल्या एका 24 वर्षीय विद्यार्थ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.पॉझिटिव्ह तरुणाबरोबर 17 व्यक्तीचा संपर्क आल्या असून सदर तरुणाच्या कुटुंबातील 9, दवाखान्यातील 5 जण, एक नाभिक, एक नातेवाईक व शिरूर येथील त्याच्या एका मित्राचा समावेश आहे.
17 व्यक्तींना ताबडतोब होमक्वारंटाइन करण्यात येणार असून पाच दिवसांनंतर त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये तरुणाने उपचार घेतले ते हॉस्पिटल सील केले आहे. गावात औषध फवारणी करण्यात येणार असून मुख्य रस्ते वगळता सर्व रस्ते बंद केल्याची माहिती सरपंच शिवाजी कदम यांनी दिली. 4 दिवसांत बाहेरगावाहून 120 लोक आले असून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. 3 किलोमीटरचा परिसर 14 दिवसांसाठी सील केला आहे.
तहसीलदार लैला शेख, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी भेट दिली. होम क्वारंटाइननंतरही पॉझिटिव्ह रुग्णाने गावामध्ये दाढी केल्याची माहिती समोर येत आहे. तो एका विहिरीवर मित्रांबरोबर पोहला असल्याची खबर आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावावरून येणाऱ्या अकराशे नागरिकांची नोंद आरोग्य केंद्राकडे झाली आहे.