‘या’ राज्याने थेट विमानाने १८० मजुरांना घरी आणले

नवी दिल्ली : देशभरात एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वत्र मजूर अडकून पडले आहेत. त्यांना परत त्यांच्या राज्यात नेण्यासाठी  श्रमिक ट्रेनची सोय केंद्र सरकारने केली आहे. या वातावरणात आता   झारखंड सरकारने  कमाल केली आहे. झारखंडने स्थलांतरित मजुरांना थेट विमानानेच राज्यात परत आणलं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी विमानाचा वापर करणारं झारखंड पहिलंच राज्य ठरलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत अडकलेल्या १८० मजुरांना एअर एशियाच्या विमानाने सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास बिरसा मुंडा विमानतळावर आणण्यात आले. मजुरांना विमानाने राज्यात परत आणण्यामध्ये बंगळुरुमधील नॅशनल लॉ स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली आहे. मजुरांना आपल्या घरी आणण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ११ लाख रुपये गोळा केले होते. मजुरांना विमानाने आणता यावं यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड सरकारकडे मदत मागितली होती.


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अशा कठीण काळात नॅशनल लॉ स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मदतीसाठी तयारी दर्शवली. या मदतीसाठी आणि माणुसकीसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या कार्यातून इतर लोकही प्रभावी होतील आणि मदतीसाठी पुढे येतील अशी आशा आहे.

सर्व १८० मजूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचं स्क्रिनिंग करण्यात आलं अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांच्या ब्रेकफास्टची व्यवस्था केल्यानंतर विशेष बसने आपापल्या घऱी पाठवण्यात आलं. या विमानातून जवळपास १२ जिल्ह्यातील मजुरांनी प्रवास करत आपलं घर गाठलं असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. तसंच बसमधून मजुरांना नेताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.