पुणे -पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 6,879 झाली असली तरी 3,661 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. सद्य:स्थितीत 2 हजार 912 व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, आतापर्यंत 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 180 रुग्ण गंभीर असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 8 हजार 521 झाली आहे. त्यामध्ये 4 हजार 179 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव रुग्ण संख्या 3 हजार 949 असून, 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 399 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 275, सातारा 28, सोलापूर 42, सांगली 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 80 हजार 303 नमूने तपासणीसाठी पाठवले होते, त्यापैकी 74 हजार 562 चा अहवाल प्राप्त आहे. 5 हजार 741 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 65 हजार 925 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8521 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. दरम्यान, विभागामध्ये फेज 1 मध्ये परदेशातून 457 व्यक्ती आले असून, फेज 2 मध्ये परदेशातून एकूण 185 व्यक्ती असे एकूण 642 जण आले आहेत. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण केले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.