व्यावसायिक गणित जुळत नसल्याने अडचण : गाळे सोडण्याकडे भाडेकरूंचा कल
– हर्षद कटारिया/समीर कोडिलकर
सहकारनगर – पहिला प्रकार, कोथरूड डी.पी. रस्त्यावरील दहा हजार स्क्वेअर फुटाच्या शो-रूम मालकाने भाडे मागितले… शो-रूम चालकाने चक्क नकार देत लॉकडाऊन काळातील भाडे घेऊ नका आणि पुढील वर्षभर मी निम्मेच भाडे देणार आहे. त्यामुळे परवडत असेल तर सांगा नाही तर मी शो-रूम खाली करून देतो… दुसरा प्रकार स्वारगेट येथील एका व्यावसायिक इमारतीमधील… व्यावसायिकाने मालकाला सांगितले मला आता मासिक भाडे देता येणार नाही. तुम्ही माझे डिपॉझिट परत द्या आणि मला मोकळे करा… हे दोन्ही प्रकार प्रातिनिधिक असले तरी आज पुणे शहरातील अनेक व्यावसायिक गाळ्यांमध्ये हेच चित्र पाहायला मिळत आहे. मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद वाढू लागले आहेत. त्यात मालकाकडे डिपॉझिट द्यायला पैसे नाहीत तर दुसरीकडे भाडेकरूला व्यवसाय नसल्यामुळे तो खर्च कमी करत आहे.
चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर व्यवसाय सुरू झाले आहेत. अडीच महिने बंद असलेले व्यवसाय आता पुन्हा लगेच सुरू होतील, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे आता ज्यांनी व्यावसायिक गाळे भाड्याने घेतली आहेत त्यातील 90 टक्के गाळेधारक गाळा परत करत आहेत. पुणे शहरात आज टिळक रोड, महात्मा गांधी रोड, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रस्ता याशिवाय उपनगरांतही अनेक ठिकाणी व्यावसायिक इमारती आहेत. या इमारतीमधील दुकाने आणि ऑफिसेस भाड्याने दिली आहेत. त्यातील कुठल्याही व्यावसायिक इमारतीमध्ये गेला तर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर कायदेशीर नोटीस देण्याचे प्रकार घडत आहेत.
हे प्रकार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यांनी ऑफिसेस घेतली आहेत त्यांना आगामी काळात व्यावसायिक गणित सांभाळावे लागणार आहे. त्यात व्यवसायासाठी कर्ज घेतले असल्यास त्याचे हप्ते आणि ऑफिसचे भाडे देणे अशा दोन्ही गोष्टींचे नियोजन करणे अवघड जात आहे. त्यापेक्षा ऑफिस खाली केलेले परवडेल अशीच धारणा भाडेकरूंची आहे. तर, मालकांनासुद्धा अचानक डिपॉझिटचे पैसे परत द्यावे लागत आहेत आणि सध्याची परिस्थिती पाहता तातडीने ऑफिस भाड्याने जाईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे सगळीच अडचण झाली आहे.
लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम आता दिसू लागले आहेत. आज पुण्यात अनेक ठिकाणी व्यावसायिक गाळे बंद पडत आहेत. व्यवसाय नसल्याने नैराश्य येत आहे. सगळेच व्यवसाय अडचणीत आहेत, अशावेळी मालकानेसुद्धा काही प्रमाणात गाळेधारकाला थोडी सूट दिली पाहिजे. याबाबत वाद न करता सामंजस्याने ते सोडविण्यासाठी दोन्ही जणांनी प्रयत्न केले पाहिजेत.
– सचिन शिंगवी, अध्यक्ष, रियल इस्टेट ऑफ एजटंस असोसिएशन