बनावट अकाऊंटवरील माहितीवर विश्वास ठेवू नये लष्कराकडून आवाहन
पुणे : भारतीय लष्कराच्या नावाने सोशल मिडियावर बनावट अकाऊंट बनवून त्याद्वारे चूकीची माहिती आणि बदनामीकारक मजकूर पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करातर्फे तातडीने हे अकाऊंट बंद करण्यात आले असून, ते नेमके कोणी तयार केले याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवरील माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.
भारतील लष्करातर्फे देशभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, महत्वाचे निर्णय, लष्कराच्या विविध तुकड्यांचा इतिहास, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे स्मरण अशी महत्वपूर्ण माहिती लष्कराच्या “एडीजीपीआय- इंडियन आर्मी’ या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली जाते.
देशातील तसेच विदेशातूनही या अकाऊंटला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. याचा फायदा घेत, काही उपद्रवी नागरिकांकडून त्याच नावाचे बनावट अकाऊंट उघडण्यात आले असल्याचे लष्कराच्या निदर्शनास आले आहे. तसेच या बनावट अकाऊंटवरून लष्कराबाबत चूकीची माहिती आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजताच, लष्करातर्फे तातडीने हालचाल करत हे अकाऊंट बंद करण्यात आले असून, नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवरील माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.