बारामती (प्रतिनिधी) – शहरातील सायली हिल परिसरातील नागरिकांनी सांगितल्याप्रमणे 101 वृक्षांचे रोपण करून त्यांचे पालकत्वही स्वीकारले आहे. मंगेशनाना ओमासे मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील सायली हिल परिसरातील साफसफाई केल्यानंतर मित्र मंडळाच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर समाजिक अंतर ठेवून वड, कडूनिंब, तसेच जांभूळ अशा प्रकारच्या 101 वृक्षांचे बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, उद्योजक रमनिक मोता, वनविभागाचे अधिकारी राहुल काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
स्वच्छ सुंदर व हरित बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने बारामती शहरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शहरातील सायली परिसरा येथून पुढील काळात देखील समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे मंगेश ओमासे यांनी सांगितले. यावेळी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, उद्यान विभागाचे मजीद पठाण यांचे देखील सहकार्य लाभल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
मंगेश नाना ओमासे मित्र मंडळ व सायली हिल येथील नागरिकांनी आठ दिवस श्रमदानातून परिसर चकाचक करीत सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपण केल्याने बारामतीत एकजुटीचा सायली हिल पॅटर्न नावारूपाला आला आहे.
– सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपरिषद