अहमदाबाद – अहमदाबाद सार्वजनिक रुग्णालयाच्या दैन्यावस्थेबाबत स्थानिक डॉक्टरने लिहिलेल्या निनावी पत्राची दखल गुजरात उच्च न्यायालयाने घेतली असून या रुग्णालयाच्या स्थितीत तातडीने सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. जर राज्य सरकारकडून परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही, तर रुग्णालयातील स्थानिक डॉक्टरांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या जातील, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.
अहमदाबाद सार्वजनिक रुग्णालयात करोनाबाधित डॉक्टरने बरा झाल्यावर रुग्णालयाती गैरव्यवस्थापन आणि अनियमिततांबाबत थेट उच्च न्यायालयाला निनावी पत्र लिहिले आहे. रुग्णालयातील गैरव्यवस्थापनामुळे डॉक्टरच करोनाचे वाहक बनत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांना पीपीई किट, एन-95 मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हजदेखील उपलब्ध करून दिले गेले नाहीत. हे सर्व साहित्य करोना वॉर्डसाठी दिले गेल्याची कारणे दिली जात आहेत.
जेंव्हा काही डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळले, तेंव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य डॉक्टरांची तपासणीही केली गेली नाही. जर ताप किंवा श्वसनास त्रास होत असेल, तरच चाचणी केली जाईल, असे डॉक्टरांना सांगण्यात आले. जर अशीच स्थिती कायम राहिली तर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडूनच करोनाचा सर्वाधिक फैलाव होईल, अशी शक्यताही या डॉक्टरने आपल्या पत्रात म्हटले आहे.