मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने जास्तीत जास्त प्रशिक्षित डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आता राज्य सरकारने केरळला प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना विनंती पत्र लिहले आहे.
केरळने योग्य नियोजन करून करोना आटोक्यात आणला आहे. केरळ पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या केरळ पॅटर्नमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसना प्रशिक्षित करण्यात आले होते. यातील 50 प्रशिक्षित डॉक्टर आणि 100 नर्सेस केरळने मुंबईत करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाठवावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
ही विनंती करताना या डॉक्टरांना आणि नर्सेसना राज्य सरकार वेतनही देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच त्यांच्या राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. त्यांना पीपीई किट इतर औषध राज्य सरकार पुरवणार आहे.
मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे 600 बेडचे विशेष रुग्णालय उभारले जात आहे. या ठिकाणी करोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयात 125 आयसीयू बेड असणार आहेत. सध्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचे डॉक्टर आणि नर्सेस दिवसरात्र रुग्णालयांमध्ये काम करत आहेत. तर काही खासगी डॉक्टर आणि नर्सेसही राज्य सरकारबरोबर काम करायला तयार आहेत.