सांगली (प्रतिनिधी) – मिरज तालुक्यातील पाटगाव येथे अंदाजे 35 वर्षे वयाच्या तरुणाचा खून करुन मृतदेह ओढ्यात टाकल्याची घटना घडली. काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाणीत अंतर्गत रक्तस्रावामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरुद्व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, पोत्यात बांधून अज्ञाताचा मृतदेह पाटगाव ओढ्यात टाकल्याची अफवा सोनी पाटगाव परिसरात पसरल्याने घटनास्थळी गर्दी झाली. पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गिल व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत तरुणाच्या पायावर पाठीवर काठीने मारल्याचे वळ होते. ओढ्याजवळ बसून मद्यप्राशन करताना बाचाबाची होऊन साथीदारांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.