कराड (प्रतिनिधी) –करोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रविवारी आणखी एक थक्क करणारी कामगिरी केली. करोना पॉझिटिव्ह असलेल्या गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील 24 वर्षांच्या गर्भवती महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले. या करोनाबाधित महिलेने आज दुपारी दीडच्या सुमारास गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व आईची प्रकृती स्थिर आहे. करोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती यशस्वी होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असून कृष्णा हॉस्पिटलमधील “करोना वॉरियर्स’ डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
ही गर्भवती मुंबईतून 15 दिवसांपूर्वी गलमेवाडी-कुंभारगाव येथे आली होती. तिच्यात करोनाची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने शुक्रवारी (दि. 22) रोजी तिला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या घशातील स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल काल (दि. 23) सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तिच्यावर स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. मनीषा लद्दड व डॉ. आशुतोष बहुलेकर यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र उपचार सुरू झाले.
तिचा गर्भधारणेचा काळ पूर्ण झाल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी तिची रविवारी दुपारी दीडच्या सुमारास सिझेरियनद्वारे तातडीने प्रसूती केली. डॉ. आशुतोष बहुलेकर, डॉ. रश्मीन साहू, डॉ. चिराग शर्मा, भूल तज्ज्ञ डॉ. माया कमलाकर, डॉ. निकिता लोले, डॉ. शालू शर्मा, बालरोग तज्ज्ञ डॉ. व्ही. वाय. क्षीरसागर, डॉ. सोहम क्षीरसागर, डॉ. साबू इब्राहिम, डॉ. सुकेश, डॉ. दुर्गाप्रसाद, नर्स जयश्री विटकर, निवासी डॉक्टर व नर्सिंग स्टाफने शस्त्रक्रियेत भाग घेतला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे कौतुक केले.