नेवासे (प्रतिनिधी)-नेवासे तालुक्यात दीड महिन्यानंतर करोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. कल्याण येथून आलेल्या 60 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
कल्याण येथून 20 मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आली. त्यानंतर या महिलेस जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.22 मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तिच्या स्त्रावाची तपासणी केली असता, तिला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान, नेवासे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जाऊन तहसीलदार रूपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, डॉ. सूर्यवंशी यांनी गावात जाऊन पाहणी करून ग्रामस्तरीय दक्षता समिती सूचना केल्या. 18 एप्रिलनंतर नेवासा तालुक्यात एक ही करोनाबाधित आढळला नव्हता.
आज पुन्हा तालुक्यात एक महिला बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. नेवासे तालुक्यात नुकतेच व्यवहार सुरळीत होऊ लागले होते. शहरात देखील दिवसाआड दुकाने उघडली गेल्याने नागरिक गर्दी करू लागले होते. मात्र आता रुग्ण आढळल्याने पुन्हा प्रशासनापुढे नागरिकांना अवरण्याण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.