पुणे – महापालिकेतर्फे लॉकडाऊन शिथिल करत, विविध व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील पारंपरिक आणि महिलांची अत्यंत आवडीची बाजारपेठ असलेली तुळशीबाग अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. येथील व्यावसायिकांना अद्याप दुकान उघडण्यास परवानगी दिलेली नाही, मात्र महापालिका येथील व्यावसायिकांचा विचार करून नकीच सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने केला होता. यामध्ये तुळशीबागेचाही समावेश आहे. महापालिकेने आता लॉकडाऊन शिथिल करत लक्ष्मी रस्ता तसेच आजूबाजूच्या भागातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तुळशीबाग अजूनही बंदच आहे. येथे 300 हून अधिक अधिकृत दुकाने आहेत. यामध्ये कपडे, बॅगा, सौंदर्यप्रसाधने, दागिने, पादत्राणे या दुकानांचा समावेश आहे.
काही दुकाने मालकीची तर काही भाड्याची आहेत. दोन महिने व्यवसाय ठप्प असल्याने दुकानदार; तसेच कामगार यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिकांची अडचण लक्षात घेत, महापालिकेने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने महापालिका आयुक्तांना दिले आहे. करोनाबाबत खबरदारी पाळून येथील व्यवसाय सुरू करण्याबाबत्त आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले.
…आता ग्राहकांची प्रतीक्षा
चौथ्या लॉकडाऊनमध्ये विविध भागामध्ये दुकानांच्या नियमांबाबत शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांसह उपनगरांतील दुकाने खुली करण्यात आली. दोन दिवसांपासून ही दुकाने सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये सोने-चांदी, कपडे, सायकल आदी दुकानांचा समावेश आहे. मात्र खरेदीदारांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे चित्र आहे. काही विक्रेते ग्राहकांना सूट देखील देत आहेत. येत्या काळात ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही व्यापाऱ्यांनी वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे. प्रामुख्याने रमजाननिमित्त शनिवारी कपड्यांच्या दुकानातील ग्राहकांची संख्या तुलनेने अधिक होती.