नवी दिल्ली – लॉकडाऊन आणि विद्यमान पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे उत्पादन क्षेत्रावर याचा सर्वाधिक परिणाम झाला असून संरक्षण क्षेत्र देखील याला अपवाद नाही. त्याऐवजी असे म्हणता येईल की, संरक्षण क्षेत्राचा एकमेव खरेदीदार हे सरकार असल्यामुळे इतर क्षेत्रांच्या तुलनेत संरक्षण क्षेत्र अधिक विस्कळीत झाले आहे.
या आव्हानांचा सामना करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उद्योगांसाठी विशेषतः एमएसएमई साठी अनेक पावले उचलली आहेत. अतिरिक्त खेळत्या भांडवलाची उपलब्धता, व्याज देयाला स्थगिती यामुळे थोडा दिलासा मिळेल. “आत्म निर्भर भारत’ मोहिमेमुळे भारतीय उद्योगांना अनेक संधी प्राप्त होतील आणि कोट्यवधी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. ते आज एसआयडीएम, भारतीय उद्योग संघटना (सीआयआय) आणि संरक्षण उत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवी दिल्ली येथे आयोजित एमएसएमई ई-बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करत होते.
आपल्या देशी स्वदेशी उत्पादने म्हणजेच ‘लोकल फॉर लोकल’ वापरायला हवीत, पण त्याआधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात ‘लोकल’ ला केंद्रबिंदू करण्याची गरज आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या आयुष्यात ‘स्वदेशी’ उत्पादनांचा अवलंब करावा लागेल. स्वदेशी उत्पादनाच्या उद्दीष्टात आणि आत्मनिर्भर भारताच्या ध्येयपूर्ती मध्ये एमएसएमईची महत्त्वपूर्ण भूमिका आहे यात शंका नाही, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
करोना विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-19 या साथीच्या विरोधातील देशव्यापी लढ्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आणि भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटीने बजावलेल्या भूमिकेचे सिंह यांनी कौतुक केले. एसआयडीएमने कार्यक्षम समन्वय आणि योग्य प्रणाली द्वारे संरक्षण उद्योग क्षेत्रात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) कीट, मास्क, व्हेंटिलेटरच्या भागांच्या निर्मितीला गती दिली आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपण केवळ आपली देशांतर्गत मागणीच पूर्ण केली नाही, तर शेजारील देशांना मदत करण्याचा देखील विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.
एमएसएमई क्षेत्र हे सकल देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे, निर्यातीद्वारे बहुमुल्य परकीय चलन मिळवून देणारे तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एमएसएमई ला मजबूत करणे हे सरकारच्या प्राधान्यांपैकी एक आहे. 8000 हून अधिक एमएसएमई या आमच्या आयुध कारखाना, डीपीएसयु आणि सेवा संस्थांसारख्या अनेक संघटनांच्या भागीदार आहेत. या संघटनांच्या एकूण उत्पादनात 20 टक्क्यांहून अधिक योगदान यांचे आहे.