मुंबई – करोनाचा धोका कायम असलेला रेड झोन वगळता एसटी महामंडळाने उर्वरित जिल्हा पातळीवर लालपरीची सेवा शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळता ही सेवा सुरू करण्यासाठी सरकारने अनुकूलता दर्शवल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे संकेत दिले आहेत. अर्थात, या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यात मुख्यत्वे सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, नंतर करोनाचा वाढता धोका पाहता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता ही सेवा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक व औरंगाबाद वगळता अन्य ज्या ठिकाणी रेड झोन नाही तिथे ही सेवा सुरू करता येऊ शकेल. त्याबाबत चाचपणी सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही परब यांनी सांगितले.
चौथ्या लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परप्रांतातून आलेले कामगार, मजूर तसेच अन्य कर्मचारी यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे तसेच रेड झोन वगळता अन्य ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली आहे.
देशात लागू करण्यात आलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यात आल्या असून त्यातच या सेवेचा समावेश करण्यात आला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसता येईल तसेच प्रत्येकाला मास्क वापरणेही बंधनकारक असेल.
ही सेवा केवळ जिल्हास्तरावरच असून परराज्यात जाण्यासाठी ही सेवा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 10 वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना केवळ अत्यावश्यक वैद्यकीय कारणानेच या सेवेचा लाभ घेता येणार आहे.