नवी दिल्ली – सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या सन 2002 च्या ग्रुप सी आणि डीच्या 44 जागांच्या भरतीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात सीबीआयने तपास करून दोन माजी मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.तत्कालिन ब्रिगेडियर एम. व्ही. भट आणि ब्रिगेडियर के. आर. एम. के बाबाजी राव अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
यातील भट सर्व्हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक होते तर बाबाजी राव हे डेप्युटी सर्व्हेअर जनरल म्हणून कार्यरत होते. हे दोन्ही अधिकारी आता निवृत्त मेजर जनरल आहेत. त्यांच्या खेरीज जे. के. रथ आणि आर रमा सिंग यांच्यावरही या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या दक्षता अधिकाऱ्याने या विषयी तक्रार केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा दोन वर्ष सर्वंकष तपास करून हे गुन्हे दाखल केले आहेत. या अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेत पास झालेल्या 44 उमेदवारांना अपात्र ठरवून अन्य 44 उमेदवारांची भ्रष्ट्र मार्गाने निवड केली आहे. या उमेदवारांच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिकाच बदलण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.