नवी दिल्ली – भारतीय महिला फुटबॉल संघाची स्टार खेळाडू बाला देवी हिच्यामुळेच नवोदित खेळाडूंनी प्रेरण घेत दिवसेंदिवस प्रगती केली असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीय महिला फुटबॉलकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशा शब्दात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बाला देवीचे कौतुक केले आहे.
मूळची मणिपूरची असलेल्या बालादेवीने स्कॉटलंडमधील मानाच्या प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेंजर्स संघाशी करार केला आहे. परदेशी संघाशी करारबद्ध झालेली बाला देवी ही पहिलीच भारतीय महिला फुटूबॉलपटू ठरली आहे. बाला देवीच्या या यशाने देशाची मान उंचावली आहे. भारतात येत्या काळात 17 वर्षांखालील महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी नवोदितांना बाला देवीकडून सरस कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वाही पटेल यांनी व्यक्त केला.
परदेशी संघात खेळताना व्यावसायिक फुटबॉल क्लबशी करार करत बाला देवीने आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली आहे. तिच्यामुळे येत्या काळात आणखीही काही खेळाडू परदेशी संघांशी जोडले जातील. महिला फुटबॉलबाबत हे खूप महत्त्वाचे असून त्यामुळेच खेळाडूंना व्यापक संधी मिळेल व भारताच्या महिला फुटबॉलचीही प्रगती साधेल. मुळातच भारतीय फुटबॉलकडे जागतिक पातळीवर अत्यंत दुर्लक्षीत नजरेने पाहिले जात होते. मात्र, पुरुष संघातील खेळाडूंप्रमाणेच आता महिला खेळाडूदेखील त्या स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत, ही नव्या युगाची नांदी ठरेल, असे मतही पटेल यांनी व्यक्त केले.