अकोले (प्रतिनिधी) –करोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात लॉकडाऊनच्या कालावधीत व्यापारी, व्यावसायिक तसेच ग्राहकांची गैरसोय दूर व्हावी, या हेतूने तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या आदेशान्वये काही लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी दिली.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील दुकाने दररोज सुरू ठेवल्याने गर्दी होऊन सामाजिक अंतर राखणे जोखमीचे होते. परिणामी करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तहसीलदार कांबळे यांच्या आदेशानुसार अकोले शहरातील दुकाने आता सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
तसेच सोमवार व गुरुवारी ऑटोमोबाईल्स (फक्त वाहन सर्व्हिसिंग करिता), कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, खेळणी दुकाने, फुले व हार, रेडियम दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी व शुक्रवारी कापड, भांडी, टेलरिंग, दोरी, पंत्रावळी, ज्वेलरी, सोने, घड्याळे, सुटकेस, फ्लेक्स बोर्डची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
बुधवारी व शुक्रवारी जनरल स्टोअर्स, कटलरी, सायकल, स्टील, भंगार, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, रंगाची दुकाने, कार वॉशिंग सेंटर, टोपल्या, बांबू दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.दररोज रविवार वगळून जीवनावश्यक सेवा अंतर्गत किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक अवजारे, बी-बियाणे, औषधे, झेरॉक्स, फोटो स्टुडिओ सुरू ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने, आस्थापना बुधवार व शनिवारी उघडे राहतील.
त्यासाठी विक्रेत्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. जे दुकानदार या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा संगीताताई शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मुख्याधिकारी डॉ. पटेल यांनी दिला आहे.