पुणे –सावित्रीबाई फुले विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या पारंपारिक पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील विषयांची तसेच सर्व सत्रांतील बॅकलॉग विषयांची लेखी परीक्षा होणार आहे. यामुळे ऑनलाइन परीक्षेच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यानुसार झालेल्या टाळेबंदीमुळे सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली होती. समितीने शिफारशीमध्ये नमूद केलेल्या तरतूदी व मार्गदर्शक तत्वे स्वीकारुन त्याअनुषंगाने कार्यवाहीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केलेली आहे. परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी परिपत्रक काढले आहे.
विलंब शुल्क आकारले जाणार नाही
जुलैमध्ये आयोजित परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमाच्या विविध सत्रातील सर्व पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना आवेदनपत्राची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. उर्वरित विद्यार्थ्यांना परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी दि. 19 ते 25 मे या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन लिंक उपलब्ध राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे विलंब शुल्क अथवा अतिविलंब शुल्क सद्यपरिस्थितीत आकारले जाणार नाही.