कराड -कराड नगरपालिकेतील विविध सभांचे कामकाज पालिकेच्या कायदा व संसदीय पध्दतीने चालले नाहीतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जाईल, असा गर्भीत इशारा गटनेते राजेंद्र यादव यांनी दिला. दरम्यान, पालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्षा शिंदे यांचा मी सांगते तीच सूचना मंजूर होणार, असा दावा केला. मात्र त्यासाठी बहुमताची गरज आहे. कालच्या सभेतील त्यांचे वर्तन व आक्रस्थळीपणा त्यांना शोभत नाही, अशी टिका लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
कराड पालिकेच्या विशेष सभेत सूचना व उपसूचना यावरून झालेल्या गोंधळ तसेच नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मांडलेली सूचना फेटाळून राजेंद्र यादव व त्यांच्या गटाने मांडलेली उपसूचना एकमताने मंजूर करण्यात आली. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, शारदा जाधव, अर्जना ढेकळे, आशा मुळे, प्रियांका यादव उपस्थित होत्या.
राजेंद्र यादव म्हणाले, कराड पालिकेत गेली साडेतीन वर्षात नगरपालिकेचे कामकाज कायदा व संसदीय पध्दतीने चालत नाही. मुळ अधिकारांची पायमल्ली होत आहे. बहुमत असणाऱ्यांना सूचना मांडण्याचा अधिकार आहे. परंतू, कालच्या विशेष सभेत सूचना लपवण्यात आली. यासाठी अध्यक्षांच्या सल्लागारांनी अधिकाऱ्यांवर दबाब आणला. संसदीय पध्दतीमध्ये सभागृहातील प्रत्येक सदस्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, मानापमानाची नाट्ये रंगवायची.
सभागृहाचे पावित्र्य भंग करायचे आणि आपले अपयश दडवण्यासाठी सभागृहात कोणालाही टार्गेट करायचे, अशी कार्य पध्दती अध्यक्षा व त्यांच्या गटाची आहे. हा खेळ गेली साडेतीन वर्षापासून सुरू आहे. परंतु, भविष्यात पालिकेतील कामकाज संसदीय पध्दतीने चालले नाहीतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अविश्वास ठराव आणावाच लागेल, असा इशारा राजेंद्र यादव यांनी दिला. दरम्यान, कर्मचारी भत्ता वर्ग तीनसाठी 3000 हजार तर वर्ग चारसाठी 6000 हजार करणे, पालिका कर्मचारी यांच्यासाठी शहरातील शारदा क्लीनिक व सह्याद्रि हॉस्पिटल विनामुल्य घेण्यास तयार आहेत.
शहरातील वाढी व घरपट्टी माफ करणे, नगरसेवकांचे मानधन व मिटींग भत्ते करोना उपाय योजनांसाठी मदत म्हणून जनरल फंडात वर्ग करणे, कोव्हिड 19च्या पार्श्वभूमीवर स्मशान भूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी व सॅनिटाझरची व्यवस्था करणे, नवीन रूग्णवाहिका व शववाहिनी खरेदी करणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटर ड्रेनेज साफसफाई करणे आदी सर्व उपसूचना एकमताने मंजूरी देण्यात आली असल्याचे माहिती यादव यांनी दिली. सौरभ पाटील, म्हणाले, नगराध्यक्षांचे अधिकार आबाधित रहावेत म्हणून आम्ही लोकशाही आघाडीच्यावतीने नेहमी पाठिंबा दिला.
परंतु, कालच्या विशेष सभेत अध्यक्षा कोणताही गृहपाठ न करता आल्या होत्या. अध्यक्षांनी मांडलेली सूचना अपूर्ण होती त्यामुळे ती फेटाळण्यात आली. मात्र गटनेते राजेंद्र यादव यांनी मांडलेली परिपूर्ण उपसूचना एकमताने मंजूर करण्यात आली आहे. हणमंत पवार, म्हणाले, कराड पालिकेच्या सभागृहात निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याचा अधिकारी आहे. मात्र, कालच्या सभेत तो अधिकार अप्रत्येक्षपणे डावलण्यात आला.
सदस्य मत मांडत असताना गोंधळ घालण्यात आला. हे संसदीय लोकशाहीला धरून नाही. सभागृहाचे पावित्र्य जपणे ही सर्वाची जबाबदारी आहे. विजय वाटेगावकर म्हणाले, कराड नगरपालिकेने चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे नेहमी कौतूक केले आहे. आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ताही दाखवला आहे. येथे कोणीाची पाठराखण करण्याचा प्रश्न येत नाही. पालिकेत काम करताना प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन काम करणे ही पालिकेसह प्रशासनाची गरज आहे.