पुणे – शहरातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन महापालिकेने म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दीड हजार बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्यापैकी 500 बेड्सची तयारी पूर्ण झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या महिनाअखेर पाच हजारापर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अति. आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल यांनी शनिवारी या सेंटरची पाहणी केली. शहरात करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर तेरा दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे नवीन रुग्ण आणि संशयित यांची सोय करण्यासाठी बालेवाडी संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि वसतिगृहाच्या तीन इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बॅडमिंटन कोर्ट येथील एका हॉलमध्ये 500 बेडची व्यवस्था केली आहे.
आयुक्त गायकवाड म्हणाले…
बालेवाडी येथील सेंटरमध्ये 100 रुग्णांमागे डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचे पथक
करोनाबाधित असलेले परंतु स्थिर असलेल्या रुग्णांवरच उपचार केले जाणार
कोणाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याच्यासाठी तातडीने व्हेंटिलेटरचीही व्यवस्था करणार
या ठिकाणी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार.