आरोप असलेल्यांच्याही नियुक्तीचे आश्चर्य
पिंपरी – पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बढत्यांचा धडाका लावला आहे. एकाच दिवशी आयुक्तांनी शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना बढत्या देत विक्रम केला आहे. या बढत्या देताना “क्रीम पोस्ट’ वरील बढत्या देत विविध आरोपांच्या पिंजऱ्यात असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी बहाल केली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्याने त्यांच्या बदलीच्या जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. पिंपरी – चिंचवड शहरात करोनाचा प्रकोप सुरु आहे. ही परिस्थिती हाताळण्याकामी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांची कसोटी लागली. प्रशासनावरील कमी पडत असलेला वचक, अधिकाऱ्यांमधील बेबनाव, यामुळे हर्डीकरांना करोनाशी मुकाबला करताना नाकीनऊ आले आहेत. त्यातच, सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे हितसंबध जोपासण्यातच अधिकचा वेळ गेल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सत्ताधाऱ्यांहूनही ही अधिक आयुक्त कायम विरोधी पक्षाच्या निशान्यावर असतात. पुन्हा त्यांनी “क्रीम पोस्ट’ वरील बढत्या देत विरोधी पक्षाच्या हाती आयते मुद्दे दिले आहेत.
महापालिका कारभारात “पॉवरफुल्ल’ समजल्या जाणाऱ्या शहर अभियंतापदावर राजन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, अ, ब, क, ई, फ, आणि ग क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच उद्यान स्थापत्य विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. कनिष्ठ अभियता ते शहर अभियंता असा प्रवास करणारे राजन पाटील यांनी विविध विभागात प्रदीर्घ काम केले असून स्थानिक अधिकारी म्हणून सर्वपक्षियांशी त्यांचे सख्य आहे. श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांना सहशहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. सवणे यांच्याकडे बीआरटीएससह विशेष प्रकल्प तर तांबे यांच्याकडे पाणीपुरवठा – जलनिस्सा:रण विभाग, पर्यावरण विभाग सोपवण्यिात आला आहे.
याशिवाय विजयकुमार काळे, शिरीष पोरेड्डी, अजय सूर्यवंशी, सुनील भागवानी, सुनील वाघुंडे, अनिल शिंदे, आबासाहेब ढवळे, रामनाथ टकले यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. तसेच, त्यांना नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कार्यकारी अभियंता पी. आर. पुजारी यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना, डी.आर. जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग, पी. पी. पाटील यांच्याकडे ब क्षेत्रीय स्थापत्य विभाग, एस. एन. इंगळे यांच्याकडे बीआरटीएस विभाग आणि पी. एस. ओंभासे यांच्याकडे बीआरटीएस परिवहन कक्ष या विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.