नगर -फळ वाहतुकीच्या वाहनातून दारुची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. रामचंद्र भिमराव लोकरे (वय 27) व दीपक भारत शेळके (वय 15 दोघे रा. कंदर, ता.करमाळा जि.सोलापूर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
फळ वाहतूक करणाऱ्या पिकअपमधून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सक्कर चौकात दुपारी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. तेव्हा पिकअप क्रमांक (एम.एच. 17 बी.वाय- 1617) या पिकअपमध्ये विदेशी दारुच्या 23 बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह 6 लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारातून दारु वाहतूक केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत नगर शहर व परिसरात रुग्णवाहिका, स्कूलव्हॅन तर आता फळ वाहतूक करणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होताना आढळून आले आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.