कराड -पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी कृष्णा हॉस्पिटलमधील करोना वॉर्डची पाहणी केली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबद्दल त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे विशेष कौतुक केले.
त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते. चेअरमन डॉ. भोसले यांनी आयुक्त म्हैसेकर यांना कृष्णा हॉस्पिटलमधील करोना वॉर्डची माहिती दिली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोनासाठी 110 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्टाफ तैनात करण्यात आला आहे.
या स्टाफला सर्व सुरक्षा साधने पुरविण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या स्टाफची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटल कॅम्पसमध्येच करण्यात आली आहे. तसेच करोनाच्या चाचण्या करण्यास परवानगी मिळाल्याने येथेच चाचणी करून निदान लवकर करणेही शक्य झाले आहे. आतापर्यंत 12 रुग्णांना करोनामुक्त करण्यात आम्हाला यश आले आहे.
अन्य करोनाबाधित सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्याचशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हैसेकर यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनांचे कौतुक करून प्रशासकीय स्तरावरील अन्य मार्गदर्शक सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या.