रायपूर -छत्तिसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका बसल्याने येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे समजते. सकाळच्या सुमारास घरी नाष्टा करताना 74 वर्षीय जोगी यांची शुद्ध हरपली. त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. छत्तिसगढची स्थापना झाल्यानंतर जोगी त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर 2003 या कालावधीत त्यांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारचे नेतृत्व केले. नंतर कॉंग्रेस नेतृत्वाशी बिनसल्याने त्यांनी जनता कॉंग्रेस छत्तिसगढ(जे) हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी जोगी यांच्या कुटूंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेतली.