मुंबई – रात्री फिरताना हटकल्याने संतप्त झालेल्या युवकाने चॉपरने पोलिसांवर वार केले. त्यात दोन पोलिस जखमी झाले असून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण रात्री उशीरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
मरीन ड्राईव्ह परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. कुलाब्यात वास्तव्यास असणारा करण प्रदीप नायर हा तरुण अर्किटेक्ट आहे. बांबू कापण्यासाठी वापरला जाणारा कोयता सोबत घेऊन तो जात होता. त्यावेळी नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले. त्यांना प्रतिसाद न देताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
करणने त्याच्या जवळील असणाऱ्या बॅगेतून कोयता काढला. त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्यावर त्याने वार केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या उपनिरीक्षक शेळके यांच्यावरही त्याने हल्ला चढवला. हल्ल्यानंतर तो पळून जाऊ लागला. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना रुग्णालयात नेले. तर काही जणांनी त्याला दोरखंड टाकून पकडले.
या तरुणाची आई एअर इंडियात आहे. हा तरूण गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. तर पोलिसांच्या मते मात्र त्याला कोणताही मानसिक आजार नाही. त्यामुळे या हल्ल्यामागच्या कारणाचे गूढ वाढले आहे.