श्रीलंका, न्यूझीलंड व द. आफ्रिकेचा पर्याय
नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यामुळे जरी आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली असली तरीही या स्पर्धेचे आयोजन होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. करोनाचा प्रभाव फारसा नसलेल्या श्रीलंका, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या देशांत ही स्पर्धा जुलैनंतर आयोजित करता येऊ शकते.
भारतात लोकसभेच्या निवडणुका असताना 2009 साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आता बीसीसीआयला एक पर्याय मिळाला असून त्याबाबत त्यांनी चाचपणीही सुरु केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 29 मार्चपासून होणार होती. मात्र, त्यावेळी करोनाचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाल्याने ही स्पर्धा 15 एप्रिलपासून घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र परिस्थिती कायम राहिल्याने ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली.
आता पुढील काळात भारतातील पावसाळा सुरु हेईल मग त्यावेळी तर स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही अशीच स्थिती दिसून येत आहे. त्यातच श्रीलंका क्रिकेट मंडळानेही बीसीसीआयला आपल्या देशात स्पर्धा खेळवू शकता असा प्रस्तावही दिला होता. आता येत्या काळात बीसीसीआयला निर्णय घ्यावाच लागणार आहे. ही स्पर्धा जर यंदा घेता आली नाही तर बीसीसीआयला अंदाजे 4 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.