पुणे – शहरातील झोपडपट्ट्यांमधील आणि दाटीवाटीच्या भागातील लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी आता महापालिकाच पुढाकार घेणार असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत “एसआरए’ प्रकल्पाचा विकसक म्हणून भूमिका बजावणार आहे. ही माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील सर्वाधिक करोना रुग्ण हे दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी भागातील आहेत. हा प्रश्न सोडवायचा असेल तर शहर झोपडपट्टीमुक्त करणेही आवश्यक आहे. “एसआरए’च्या माध्यमातून ते होऊ शकते. हे प्रकल्प करण्यासाठी एफएसआयच्या मोबदल्यात अनेक विकसकांनी केले आहेत.
आता मात्र हेच प्रकल्प विकसक म्हणून महापालिका करणार आहे. यासाठी 8 ते 10 नवीन पर्याय महापालिका मांडणार आहे. या आठवड्यात या पर्यायांचा आराखडा तयार करून स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. ताडीवाला रोड, लुंबिनी नगर आदी भागांत रुबी हॉल क्लिनिकमधून लागण झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे करोनाचा प्रसार वेगाने झाला. त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपचार करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात रुबी हॉलला जिल्हा दंडाधिकारी, महापालिका आयुक्तांकडून पत्र देण्यात आले आहे. या रुग्णालयांसह शहरातील काही खासगी रुग्णालयांचे वागणे अरेरावीचे आहे. त्यांना शासकीय नियमावलीत आणणे अत्यंत आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नाहीत, रुग्ण न घेण्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहेत. हा प्रश्न बिलांमुळे निर्माण होत आहे. रुग्णालयांसोबत महापालिका करार करणार असून, त्यानंतर त्यांच्या बिलांचा प्रश्न मार्गी लागेल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
महापालिका वाटणार एक लाख कीट
शहराच्या मध्यवस्तीतील जो भाग “कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर केला आहे, त्या भागातील नागरिकांना पंधरा दिवसांचा शीधा, भाजी असे जीवनावश्यक वस्तूंचे कीट 1 लाख नागरिकांना वाटण्यात येणार आहेत.