500 हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश
लाहोर : पाकिस्तानमधील करोनाबाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये 250 डॉक्टरांसह 503 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये करोनाने आतापर्यंत 476 रुग्णांचा बळी घेतला आहे. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब या प्रांतांना करोनाचा सर्वांधिक तडाखा बसला आहे. त्या प्रांतांमधील करोनाबाधितांची संख्या प्रत्येकी 8 हजारांच्या घरात पोहचली आहे.
करोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सर्वांधिक संख्या पंजाब प्रांतात आहे. करोनाशी लढा देताना पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. तेथील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी स्वत:च्या बचावासाठी उपकरणे आणि सामग्री मिळत नसल्याची तक्रार सातत्याने करत आहेत. अशातच वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाने स्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाकिस्तानात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, दीर्घकाळ ते निर्बंध लागू ठेवणे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याची भूमिका त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने मांडत आहेत. सोमवारीही त्या भूमिकेचा पुनरूच्चार करताना इम्रान यांनी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचे सूतोवाच केले.