शिक्रापूर, दि. 30 (वार्ताहर) – श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील दोन वर्षीय चिमुरडीचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून करोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. चिमुरडीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी व आरोग्य अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्रापूर येथील करोना बाधित डॉक्टरच्या दवाखान्यात चिमुरडीच्या आईने सोनोग्राफी केली होती. खबरदारी म्हणून चिमुरडीला करोनाचा संसर्ग झाला की नाही हे पाहण्यासाठी तिच्या पालकांनी खासगी दवाखान्यात करोनानाची तपासणी केली. त्यात ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता.
त्यामुळे पुण्यातील भारती विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये चिमुरडीवर 16 एप्रिलपासून 14 दिवस उपचार सुरू होते. त्यामुळे बुधवारी (दि. 29) या मुलीची पुन्हा तपासणी करण्यात आली.
विठ्ठलवाडी गावामध्ये दि. 17 पासून गुरुवार (दि. 30) पर्यंत आरोग्य विभागाच्या माध्यमातून 18 कर्मचाऱ्या अंतर्गत करोना बाधित क्षेत्राचा 14 दिवसांचा सर्वेक्षण कालावधी पूर्ण झाला.
यावेळी ग्रामपंचायतीने करोनाचा सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रमाणपत्र, सेनीटायझर व मास्क सरपंच ललिता गाडे व उपसरपंच तानाजी मारणे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, आरोग्य विस्ताराधिकारी लवांडे, ग्रामसेवक दादासाहेब नाथत पी. बी. जगताप, बाबाजी गवारे, दिलीप गवारे, पोलीस पाटील शरद लोखंडे, ज्ञानेश्वर राऊत, किसन गवारे, प्रशांत गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.