पिंपरी (प्रतिनिधी) – गोरगरिबांना शासन अन्नधान्य व रेशन देत आहे. श्रीमंतांकडे मुबलक पैसे असल्याने ते लॉकडाऊनच्या काळात आरामात जगत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मध्यमर्गीयांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. पगार मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. मध्यमवर्गियांच्या समस्येला पिंपळे गुरवमधील एका महिलेने वाचा फोडत खासदार, आमदार आणि नगरसेवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारला. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढत तिला मदत मिळवून दिली. तसेच सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत तिला नोटीसही बजावली.
पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका महिलेने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये तिने मध्यमवर्गाची व्यथा मांडली. सोबतच निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या परंतु अडचणीच्या काळात कोणतीच मदत न करणाऱ्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार सर्वांवरच सडकून टीका केली.
निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांचे नेते मत मागण्यासाठी आमच्या दारापर्यंत येतात. कार्यकर्ते गोळा करून प्रचार करतात. आता या कार्यकर्त्यांना खरी मदतीची आवश्यकता असताना खासदार, आमदार आणि नगरसेवक घरात बसले आहेत. पुढच्यावेळी आमच्या दारात आणि गल्लीतही मत मागायला येऊ नका, असा थेट इशारा त्या महिलेने व्हिडिओद्वारे दिला. त्या महिलेने केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारल्याने त्या महिलेचे कौतुकही होत आहे.
पोलिसांनी घेतली दखल..
त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना पोलिसांनी याची दखल घेतली. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले. तिला आवश्यक असलेले रेशन मिळवून दिले. परंतु सोबतच तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबाबत तिला नोटीसही बजावण्यात आली आहे. मध्यमवर्गाची व्यथा मांडणाऱ्या महिलेने पुन्हा अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करु नयेत, यासाठी पोलिसांकडून तिला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली.
“लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्हिडिओमधील महिलेला रेशनवरील धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र तिने नागरिकांना भडकविणारे आणखी काही व्हिडिओ तयार करू नये, म्हणून त्या महिलेला नोटीस बजावली आहे.
– ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे