मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला, फळ, मसाला आणि धान्य मार्केट सुरु आहे. मार्केट सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे येथेही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये काल एका व्यापाऱ्याला आणि सुरक्षा अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. तर आज एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली आहे.
करोनाबाधित होणारा एपीएमसीतीला हा सहावा व्यापारी आहे. हा व्यापारी धान्य मार्केटच्या जी विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैरानेमधील रहिवासी आहे. याआधी एल विंगमधील व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला, एका भाजीपाला व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
दोन दिवसात तीन जणांना करोनाची लागण झाल्यानं बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एपीएमसीमध्ये करोनाचा गुणाकार सुरू झाल्याने नवी मुंबईकरांना डोकेदुखी वाढणार आहे. सध्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू झाले आहे.