यवतमाळ : यवतमाळमध्ये आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता रुग्णांची एकूण संख्या 14वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझेटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने यवतमाळ शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. वरील बंदच्या काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषधी दुकाने पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधी दुकाने सुरू राहील.
तसेच दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेकरीता पेट्रोलपंप राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाणे व येण्याकरीता मुभा राहील. सदर आदेश फक्त यवतमाळ शहराकरीता लागू राहतील. यवतमाळ जिल्ह्यातील इतर शहरी ग्रामीण भागाला हे आदेश लागू राहणार नाही. त्या ठिकाणच्या मुभा देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा याआधी ठरवून दिलेल्या वेळेनुसारच सुरू राहतील.