पुणे : महापालिका हद्दीतील तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा शंभरीपार गेला आहे .तर दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 75 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे या पाच क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सुमारे 70 टक्के रुग्ण असल्याचे स्मार्ट सिटी कडून करण्यात आलेल्या रुग्णांच्या मॅपिंग मधून समोर आले. शहरात 9 मार्च पासून करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली होती. सर्वात आधी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले होते.
त्यानंतर दीड महिन्यात या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आता पर्यंत 9 रुग्ण वाढले असून त्यातील 5 जण बरे झाले आहेत तर 4 जण मागील आठवड्यात नव्याने सापडले आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यात शहरातील एकूण आकडा 768 वर गेला आहे. त्यात 22 एप्रिल अखेर सर्वाधिक 171 रुग्ण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. तर 111 रुग्ण कसबा- विश्रमाबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 110 रुग्ण ढोले- पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. त्या पाठोपाठ 82 रुग्ण येरवडा- कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 77 रुग्ण आहते.
त्या खालोखाल धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्द 43, वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय 34, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 24, हडपसर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 26, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय 18, तर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात 12 रुग्ण असून, कोथरूड , वारजे – कर्वेनगर औंध क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत.