पुणे – औषध विक्री करताना विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नागरिकांना औषधे देऊ नयेत, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठल्याही प्रकारचे औषध दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध विभागाने दिला आहे.
औषधांच्या दुकानात कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय नागरिकांकडून औषधांची मागणी केली जाते. काही ठिकाणी रुग्ण अथवा रुग्णांचे नातेवाईक सर्दी, ताप, खोकला यासाठी कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध खरेदी करण्यासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.