ओतूर (प्रतिनिधी) – वाढदिवसाचा आनंदोत्सव भल्याभल्यांना भुरळ घालतो आणि कधी कधी जे नको तेच होऊन बसतं. असाच प्रकार जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक (सहकार नगर) येथे घडला व संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा झाली. लॉकडाऊनच्या उच्चशिक्षितांकउून काळात असे प्रकार होण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुलाचा वाढदिवस साजरा करताना उत्साहात तलवार हातात घेऊन व्हिडीओ बनवला. तो सोशल मीडियावर प्रसारीत केल्याचा प्रकार येथील वकील महाशयांना चांगलाच महागात पडला. याबाबत ओतूर पोलिसांनी संबंधित वकिलासह त्याचा चुलतभाऊ व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून तलवार ताब्यात घेतली आहे. अरूण रामचंद्र गाडेकर व त्यांचा अल्पवयीन मुलगा व चुलतभाऊ स्वप्निल चंद्रकांत गाडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, सहकारनगर, हिवरे बुद्रूक येथे राहणारे वकिल अरूण रामचंद्र गाडेकर यांच्या मुलाचा शनिवारी (दि. 11) वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करताना केक कापण्यापूर्वी गाडेकर यांच्या अल्पवयीन मुलाने बेकायदा, अनधिकृतपणे तलवार हातात घेऊन तलवारीचा फोटो लोकांच्या समोर दहशत निर्माण होईल या उद्देशाने टिकटॉक व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर प्रसारीत केला. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेऊन अरूण रामचंद्र गाडेकर यांच्या घरी जाऊन तलवार ताब्यात घेतली. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई मगन भुसावरे यांनी दिली. पोलीस नाईक मुकुंद मोरे हे पुढील तपास करीत आहेत.