बॉलिवूडमधील ऍक्शन हिरो म्हणून ओळख असलेल्या टायगर श्रॉफच्या “बागी-3’ला चाहत्यांनी भलेही पसंती दर्शविली नसली तरी या चित्रपटाने 150 कोटींपर्यंतचा गल्ला जमविला असता; परंतु करोनामुळे देशभरातील चित्रपटगृहांना टाळे लागले. यामुळे “बागी-3’चा प्रवास अर्धवटच राहिला.
तसे पाहता बागी सीरिजला टायगरच्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि एकटा टायगरला देशाकडून लढताना पाहणे हा एक थरारक अनुभव आहे.
मात्र, चित्रपटगृह अचानक बंद झाल्याने टायगरही दुःखी झाला आहे. कारण अनेक जणांनी हा चित्रपट पाहता आला नसल्याचा संदेश टायगरला पाठविले आहेत. दरम्यान, हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा की ओटीटी प्लेटर्फामवर रिलीज करावा, याबाबत चित्रपट निर्माता साशंक आहे. तसेच चित्रपटगृह कधी सुरू होणार हेही निश्चित नाही. अन् चित्रपटगृह खुले झाले तरी किती प्रेक्षक बाहेर येतील हे अनिश्चित आहे. त्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर येण्याची जास्त शक्यता आहे.
एका मुलाखतीत टायगर म्हणाला की, सध्या “बागी-3′ चित्रपट चाहत्यांपर्यंत कसा पोहोचणार याबाबत मी विचार करत आहे. तसेच “बागी-4’चीही लवकरच घोषणा करण्यात येईल. “बागी-4′ नक्कीच साकारला जाईल. दरम्यान, टायगरने आपल्या छोट्या कारकिर्दीत यशस्वीपणे फ्रॅंचायझीचा भाग बनवून सर्वांनाच चकीत केले आहे. टायगरने एक ऍक्शन स्टार म्हणून आपली प्रतिमा बनविली आहे.