अहमदाबाद: सुमारे आठ महिन्यांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेचा (आयएएस) राजीनामा देणाऱ्या कन्नन गोपीनाथन यांना पुन्हा ड्युटी जॉईन करण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली. मात्र, गोपीनाथन यांनी पुन्हा सेवेत रूजू होण्यास नकार दर्शवला आहे.
दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात रूजू असताना गोपीनाथन यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये राजीनामा दिला. कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरात निर्बंध लागू करण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलले. जम्मू-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य नाकारले जात असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. राजीनामा दिल्यानंतर आठवडाभराने सरकारने त्यांना सेवेत रूजू होण्यास सांगितले होते. त्यावेळीही त्यांनी नकार दिला होता. आता करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा ड्युटी जॉईन करण्यास सांगण्यात आले आहे.
गोपीनाथन यांना अद्याप राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे कळवण्यात आले. मात्र, राजीनाम्यावर ठाम असणाऱ्या गोपीनाथन यांनी सरकारचा नवा प्रस्ताव स्वीकारण्यासही नकार दिला. सरकारला केवळ जनतेची आणि अधिकाऱ्यांची छळवणूक करता येते. त्यांना माझी आणखी छळवणूक करायची आहे. अर्थात, सध्याच्या अवघड काळात स्वेच्छेने सरकारला मदत करण्याची माझी तयारी आहे. मात्र, पुन्हा आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केरळला पुराने तडाखा दिला त्यावेळी केलेल्या कार्यामुळे गोपीनाथन कौतुकाचा विषय बनले होते.