देशव्यापी गटात पुणे विद्यापीठातील संशोधकांचा समावेश
पुणे – करोना साथ सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शास्त्रज्ञ कोविड-19 च्या प्रसाराबाबत विविध अंगाने अभ्यास करत आहेत आहेत.
लॉकडाऊन सुरू होण्याआधीच विद्यापीठातील ‘सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन’ च्या डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर यांनी साथीचा रोग कसा पसरेल, याचे नवे गणितीय प्रारूप (मॉडेल) तयार करून देशांतर्गत वाहतूक कशी बंद करणे महत्वाचे आहे, हे दाखवून दिले होते. त्यांच्या या कामाची दखल देशातील शास्त्रज्ञांनी घेतली आणि त्यांना अखिल भारतीय शास्त्रज्ञांच्या समूहात पुढील गणितीय प्रारूपे तयार करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या भारतातील मोठ्या संस्था-चेन्नईची गणितीय विज्ञान संस्था, बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था, यांच्यातील शास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन’चे शास्त्रज्ञ हे लॉकडाउननंतर काय घडू शकते, यावर काम करत आहेत.