जिल्ह्यात करोनाशी संबंधित साडेतीनशे गुन्हे

सातारा -सातारा जिल्ह्यात करोना विषाणूने बाधित झालेला पहिला रुग्ण मिळाल्यापासून सोशल मीडियावर अनेक बातम्या, पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप, फोटो प्रसिध्द होत आहे. यामध्ये करोना विषाणूच्या संर्दभाने खोटया बातम्या, अफवा पाठवणाऱ्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या अशा एकूण 350 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याचे तसेच समाजात दुही निर्माण होईल, असे मेसेज फिरत असल्याचे पोलीसांच्या नजरेस आले होते. त्यामुळे पोलिसांनी अशांचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल साडेतीनशे लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अनेकांना अटकही झाली आहे. लोकांनी याबाबत सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे. त्याबाबत घ्यावयाच्या काळजीविषयी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  यांनी माहिती दिली.

त्यानुसार फेसबुक, ट्विटर, इन्सटाग्राम, व्हॉटसअप या सोशल मीडियावर करोना विषाणूपासून वाचण्याचे घरगुत्ती, आयुर्वेदिक उपाय, करोना विषाणू बाधित लोकांची संख्या, त्यांची नावे, त्यांच्या संर्पकात आलेल्यांची यादी, करोना विषाणूवर आधारीत तज्ज्ञ व्यक्तींची मते, फोटो, ऑडिओ क्‍लिप, व्हिडिओ, सरकारने जाहीर केलेले लॉकडाऊनसंबंधातील सूचना व कालावधी याबाबत चुकीची माहिती, करोना विषाणू संर्दभाने जातीय, धार्मिक तेढ वाढेल असे मेसेज पसरवणे, करोना विषाणूने ग्रस्त असणारे लोकांचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ स्वरुपात प्रसारित करणे, करोना विषाणूसंर्दभात लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होईल, असे मेसेज प्रसारित करणे, अशा पध्दतीचे मेसेज आले असतील तर ते पुढे कोणाला पाठवू नका अन्यथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन तसेच सायबर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सातपुते यांनी दिला आहे.

…असे आहेत दाखल गुन्हे
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश भंग केल्याने कलम 188 नुसार 337 गुन्हे, धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे, जीवनावश्‍यक वस्तुंचा काळाबाजार केल्याप्रकरणी पाच गुन्हे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चार, अफवा आणि चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे. असे एकूण 350 दखलपात्र गुन्हे करोनाच्या काळात दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.